From Rural India to Global Top 10 Pune ZP School: एकेकाळी केवळ तीन विद्यार्थ्यांनी सुरु झालेल्या एका छोट्या जिल्हा परिषद शाळेने आज जागतिक शिक्षण नकाशावर आपले नाव कोरले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा आता जगातील टॉप 10 शाळांमध्ये गणली जात असून, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात हे एक मैलाचा दगड ठरले आहे. खेडोपाडी शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा या शाळेने पूर्णपणे बदलून टाकली आहे.
इंग्लंडस्थित टी4 एज्युकेशन संस्थेने आयोजित केलेल्या ‘जगातील सर्वोत्कृष्ट शाळा’ या जागतिक पातळीवरील स्पर्धेमध्ये जगभरातल्या प्रगत देशातील व खासगी क्षेत्रातील लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा अंतिम सर्वोत्तम दहा शाळा निवडीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये लोकसहभाग प्रकारात भारतातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे.

राज्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या शाळेने अल्पावधीतच अकल्पनीय प्रगती साधली आहे. केवळ तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १२० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, हेच या शाळेच्या यशाचे ज्वलंत उदाहरण आहे. शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हे यश शक्य झाले आहे. शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता, शिक्षकांनीच पुढाकार घेऊन निधी संकलन केले आणि शाळेच्या गरजा पूर्ण केल्या. यामुळेच ही शाळा केवळ चार भिंतींपुरती मर्यादित न राहता, आधुनिक शिक्षणाचे एक उत्कृष्ट केंद्र बनली आहे.
या शाळेतील शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे डिजिटल शिक्षण, संशोधन, कृषी, हस्तकला, विज्ञान प्रयोग, योगा, आणि क्रीडाविषयक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. शाळेत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स लॅब, सुतारकाम, प्लंबिंग, भाषा शिक्षण यांसारख्या कौशल्य आधारित विषयांचे शिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाते. ‘सरकारी शाळा म्हणजे भावनिक जागा नाहीत’ किंवा ‘चुकीच्या समजुतीला खोटे ठरवून’ या शाळेने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या शाळेने केवळ शिक्षणच दिले नाही, तर समाज परिवर्तनाची एक जिवंत गाथा लिहिली आहे. येथे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन काम करतात. प्रत्येक गुरुवारी विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणारे नवे चित्रपट, नवनवीन शैक्षणिक प्रयोग आणि जागतिक स्तरावरील यशोगाथा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची तीव्र इच्छा निर्माण होते. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडवण्याची ताकद आहे, हे या शाळेने सिद्ध केले आहे.
पुणे जिल्ह्यातील या जिल्हा परिषद शाळेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात शिक्षणाच्या क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली आहे. ही शाळा एक आदर्श मॉडेल बनली असून, इतर शाळांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. भविष्यात अशा अनेक शाळा निर्माण होऊन प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळेल अशी आशा करूया.
न्यूज अनकट प्रतिनिधी; साक्षी पांचाळ