दौंड : कुरकुंभ (ता.दौंड) येथील पांढरेवाडीचे उद्योजक व पांढरेवाडीच्या विद्यमान सरपंच यांचे पती नाना झगडे यांना नुकतेच रात्रीच्या दीड वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर तीन इसमांनी तलवारीचा धाक दाखवुन लुटले.
पुण्याहून खाजगी काम करून मित्रांबरोबर रात्री दीडच्या सुमारास झगडे हे घराच्या काही अंतरावर असणाऱ्या सेवा रस्त्यावर उतरून पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जात असताना महामार्गाच्या दुभाजकाच्या मध्ये त्यांना अडवून मागील बाजूने तीन इसमांनी तलवार दाखवुन त्यांच्या कडील असणारा मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख आठ हजाराची रक्कम लुटली. कुरकुंभ औद्योगीक व कुरकुंभ परिसरातील रात्रीत चोरीचं सत्र थांबता थांबेना तर दुसरीकडे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना, कामगारांना देखील लुटमारीच्या घटना वाढत आहेत.
थंडीच्या रात्रीत कुरकुंभ परिसर हा एकमेकांना फोन करून जागते रहो च्या आवाजाने ग्रासला जात आहे. रोजचं घरफोडी व इतर चोरीच्या माध्यमातुन ग्रामस्थ त्रस्त असताना आता लुटमारीच्या घटना देखील वाढत आहेत. यामध्ये तलवारी सारख्या हत्यारांचा वापर होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. गावातील बरीच तरुण मंडळी सध्या आपआपल्या परिसरात रात्रीचा पहारा देण्यात व्यस्त दिसत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील रात्र पाळीला जाणारे किंव्हा परत येणाऱ्या कामगारांना मुख्य करून लक्ष केले जात असल्याचे आजवर दिसुन आले. मात्र रात्रीच्या दीड वाजण्याच्या सुमारास कामाची कुठलीच वेळ नसते. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना देखील पाळत ठेऊन लक्ष करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. औद्योगीक क्षेत्रात जाणाऱ्या कामगारांवर लुटमारीचा शिकार होण्याची टांगती तलवारच लटकत आहे. रस्त्याने जाणारी कुठलीही एकटी व्यक्ती निर्जन स्थळावरून जात असताना या घटना घडत आहेत.
दरम्यान, पोलीसांच्या रात्रीच्या गस्तीचा देखील धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचे वरील घटनेवरून दिसुन येत आहे. त्यामुळे फक्त गस्तच नाही तर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर पोलीसांनी अवलंबला पाहीजे. रोजचं वेगवेगळ्या परिसरात होणाऱ्या वेगवेगळ्या घटनेने पोलीस प्रशासनासमोर आवाहन उभे ठाकले आहे तर पोलीसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगारांना कसलीच भीती राहिली नसल्याने गुन्हेगार हे सराईत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. मात्र या सर्व प्रकारातुन कुरकुंभ परिसरात रात्रीच्या वेळेस कमालीची खबरदारी घेऊन देखील चोर बिनधास्तपणे चोरी करीत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. मागील आठवड्यात चोरीच्या घटनेत पोलीसांनी एक दुचाकी क्रमांक एमएच १२ आर यु ४१४२ हि जप्त केली आहे. मात्र हि दुचाकी देखील चोरीची असल्याचा पोलीसांचा संशय आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.
पोलीसांचे कमी संख्याबळ, ग्राम सुरक्षा दलाचा अभाव
कुरकुंभ येथे औद्योगीक क्षेत्राच्या परिसरामुळे अनेक गुन्हेगारांना सहज आश्रय घेणे शक्य झाले आहे. हजारोच्या संखेने आलेला कामगार वर्गाचा गैरफायदा घेत गुन्हेगार परिसरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करण्यासाठी पोलीसांना संख्याबळ वाढवणे आवश्यक आहे. कुरकुंभ येथे पोलीस उपनिरीक्षक, दोन हवालदार व दोन नाईक शिपाई किंव्हा शिपाई दर्जाचे कर्मचारी आहेत. मात्र विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असताना हे संख्याबळ अपुरे पडत आहे. तर कधीकाळी पोलिसांच्या मदतीला असणारे सक्षम ग्राम सुरक्षा दलाचा पर्याय वापरला जात नसल्याने फक्त पोलीसांच्या संख्येवर आधारीत उपाययोजना पुरेशी होत नसल्याचे दिसुन येत आहे.
यापूर्वी ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ग्रामस्थांचा व पोलीसांच्या संवाद होत होता. तरुणांना रात्रीच्या वेळेस काठी, बँटरी, सुरक्षा जँकेट, ओळखपत्र असे साहित्य उपलब्ध करून दिले जात होते. त्यामुळे एका पोलीसाबरोबर दहा तरुण अश्या संखेने रात्री गस्त होत होती. मात्र सध्या ह्या यंत्रणेचा देखील रीतसर उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या परिसरात जमाव करून रात्रीत बाहेर बसत आहेत.कुरकुंभ पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या कुरकुंभ व औद्योगीक परिसरातील चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी कुरकुंभला पोलीसांची संख्या वाढवली आहे. औद्योगीक क्षेत्रातील कंपनीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या व या परिसरातील विविध ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातुन गुन्हेगारांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे.ग्राम सुरक्षा दलाच्या बाबतीत देखील लवकर निर्णय घेऊन त्या माध्यमातुन देखील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
-सुनील महाडीक, पोलीस निरीक्षक दौंड