पुण्यातील पिंपळगाव फाटा परिसरात एका विद्यार्थिनीवर भरधाव कारने जोरदार धडक दिली. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पायी निघालेली ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय 19) हवेत उडाली आणि रस्त्यावर कोसळली. धडक इतकी भीषण होती की ती सात-आठ फूट हवेत फेकली गेली. तिच्या डाव्या पायाला आणि टाचेला गंभीर इजा झाली असून सध्या ती मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण धडकेचा स्पष्ट प्रकार कैद झाला आहे.
अपघातानंतर वाहनचालक शरदराव शिंदे यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत मंचर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल झाली नाही. ऋतुजाच्या आईने सांगितले की, “माझं लेकरू वाचलं, हेच मोठं आहे. पुढच्या सहा महिन्यांत उपचारासाठी घरातच बसावं लागणार आहे. मी रुग्णालयात साफसफाईचे काम करून घर चालवते. खर्च कारमालकाने उचलला तर आम्ही पोलिसांकडे जाणार नाही.”
ऋतुजाच्या अपघाताने संपूर्ण परिसर व्यथित झाला असून तिचे स्वप्न आणि भविष्य संघर्षमय झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































