गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणेकरांसाठी गूड न्यूज; महापालिका लवकरच 70 हजार विद्युत खांबांचे पुनर्वितरण करून वाहतूक...

पुणेकरांसाठी गूड न्यूज; महापालिका लवकरच 70 हजार विद्युत खांबांचे पुनर्वितरण करून वाहतूक कोंडीतून सुटका करणार

पुणेकर हे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. शहरातील वाहतूक सुकर करण्यासाठी पुणे महापालिका आणि महावितरण लवकरच काही महत्त्वाची पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.

शहरातील मुख्य रस्ते आणि गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी महापालिकेने आणि महावितरणने सांघिक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब, फीडर पिलर आणि इतर अडथळे हटवण्याचे नियोजन केले जाईल.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही दिवसांपूर्वी पथ विभागाच्या बैठकीत वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शहरातील 32 महत्त्वाच्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सुमारे 200 हून अधिक कनिष्ठ अभियंते उतरले. या पाहणीमध्ये चौकांत आणि रस्त्यांवर विविध प्रकारचे अडथळे असल्याचे स्पष्ट झाले.

पुढील बैठकीत महापालिका, वाहतूक पोलीस आणि महावितरण अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले, “अनेक चौक आणि पदपथांवर विजेचे खांब व फीडर पिलर हे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि नियोजन करणारी संयुक्त समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

महावितरणच्या आकडेवारीनुसार, शहरातील पदपथांवर सुमारे 70 हजार विद्युत खांब उभे आहेत. यापैकी अनेक खांब वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. योग्य पर्यायी जागा शोधून त्यांच्या स्थानांतराचे नियोजन समितीकडे दिले जाईल.

ही योजना पूर्णत्वास येताच पुणेकरांना शहरातील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version