पुण्यात आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर AI कॅमेऱ्यांची नजर

17
Pune traffic police deploy AI cameras
पुण्यात आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर AI कॅमेऱ्यांची नजर

Pune traffic police deploy AI cameras: पुणे शहर वाहतूक शाखेने आता वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे नो पार्किंग, डबल पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवणार आहेत.

कशी काम करणार ही यंत्रणा?

या अत्याधुनिक यंत्रणेमुळे, नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने किंवा मुख्य रस्त्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने AI बेस्ड कॅमेऱ्यांच्या निदर्शनास येतील. हे कॅमेरे वाहनांची नंबर प्लेट पडताळणी करून तात्काळ वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतील. वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही चलन प्रणालीच्या माध्यमातून ही कारवाई केली जाईल.

पुणे वाहतूक शाखा आणि सेन्सेन एआय कंपनीचा पुढाकार

पुणे वाहतूक शाखा आणि सेन्सेन एआय कंपनीचे विजय खुस्पे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ए.आय. आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणाली’ विकसित करण्यात आली आहे. अमितेश कुमार (पोलिस आयुक्त, पुणे शहर), रंजनकुमार शर्मा (सहपोलिस आयुक्त), मनोज पाटील (अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग), डॉ. संदीप भाजीभाकरे (अति. कार्यभार पोलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

नागरिकांनाही मिळेल माहिती

वाहनचालकांना या नवीन सिस्टिमची माहिती व्हावी यासाठी फर्ग्युसन कॉलेज रोडवर स्क्रीनच्या माध्यमातून देखील माहिती दिली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आहे.

भविष्यात पुणेभर विस्तार

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील या प्रायोगिक सिस्टिमचे विश्लेषण केल्यानंतर, भविष्यात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या रस्त्यावर या ‘ए.आय. आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणाली’ चा वापर केला जाणार आहे. वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पुणेकरांनो, नियमांचे पालन करा, नाहीतर AI कॅमेरा तुमच्यावर नजर ठेवून आहेच !

न्यूज अनकट प्रतिनिधी,साक्षी पांचाळ