Pune News : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर, आज एका गंभीर प्रश्नाने हादरले आहे. भरदिवसा, शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर, दोन युवक बिनधास्तपणे दारू पित बसलेले दिसले. त्यांच्या हातात दारूची बाटली आणि सिगारेट होती. कोणत्याही भीतीशिवाय ते उघडपणे मद्यपान करत होते, आणि विशेष म्हणजे, या मार्गावरून अनेक महिला, लहान मुले आणि शाळकरी मुली ये-जा करत होत्या.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भररस्त्यात मद्यपान करणाऱ्या या तरुणांना कुणीही रोखले नाही. ना पोलीस आले, ना नागरिकांनी विरोध केला. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मद्यपान करण्यास कायद्याने बंदी आहे, तरीही या युवकांना कोणत्याही नियमांची भीती नव्हती.


पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते, परंतु अशा घटनांमुळे ती ओळख धूसर होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. बिहारसारख्या राज्यांमध्ये दारूबंदी असूनही अनेक समस्यांना लोक तोंड देत आहेत, मग पुण्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही ना? पोलिस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा, सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या या प्रकारांमुळे महिलांसाठी शहर अधिक असुरक्षित होऊ शकते.
महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ चर्चेचा विषय राहणार आहे की यावर ठोस उपाययोजना केली जाणार? प्रशासनाने याचा विचार करून तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच, नागरिकांनीही अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे