पुणे विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कात २०% वाढ; विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सत्र परीक्षा शुल्कात तब्बल २० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ २०१८-२० या कालावधीत झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झाली होती. मात्र, करोनामुळे ती प्रत्यक्षात लागू करण्यात आली नव्हती. जवळपास सात वर्षांनंतर आता पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही शुल्कवाढ लागू करण्यात आली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे परीक्षा पद्धतीत बदल झाले आहेत तसेच विषयांची संख्या वाढली आहे. विद्यापीठाने प्रत्यक्षात ५५ टक्के शुल्कवाढ अपेक्षित असल्याचे नमूद केले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून केवळ २० टक्क्यांची वाढ लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठाने परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सर्व विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या निर्णयाचा विद्यार्थ्यांमध्ये तीव्र विरोध होत आहे. विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) या आंदोलनाला सुरुवात होणार असून, वाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील