पुणे, १५ ऑक्टोंबर २०२०: काल राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्यानं देखील १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या दरम्यान सतर्कतेचा इशारा दिलाय. मात्र, पुण्यामध्ये देखील काल मुसळधार पाऊस झाला. पुण्यातील रस्ते जलमय झाले होते, तर अनेक ठिकाणी पाणी रुग्णालय, इमारती व घरांमध्ये देखील घुसले. इतकेच काय तर याचा विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळं पुणे विद्यापीठाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात येतेय. पुण्यातील अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळं आजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळं पुण्यातील अनेक रस्ते ओसंडून वाहत होते. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पुण्यातील सर्व पेठांमध्ये रस्त्यांवरून ओसंडून पाणी वाहत होते, तर दगडूशेठ हलवाई मंदिरात देखील पाणी घुसले होते. ही स्थिती पुढील दोन दिवसात देखील उद्भवू शकते याची दखल घेत विद्यापीठानं या परीक्षा रद्द केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे