भाजपमध्येच प्रभागरचनेवरून धुसफुस, सुनावणीवेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी!

आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेमुळे सत्ताधारी भाजपमध्येच अंतर्गत वाद दिसून येत आहे. ही रचना काही पदाधिकाऱ्यांसाठी अनुकूल असली, तरी अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे हरकती आणि सूचनांच्या सुनावणीवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

यावेळी कसबा पेठ भागाला कोणत्याही प्रभागाचे नाव न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, तर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धंगेकर यांनी ‘आपला कसबा कुठेय?’ असा फलक झळकावून प्रशासनाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही या रचनेवर आक्षेप घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जावळे यांनी प्रभागरचनेत बदल न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

‘राधा आणि राम’ यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे म्हणत, नागरिकांनी अपर मुख्य सचिव व्ही. राधा आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यापुढे आपली कैफियत मांडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे