पुणे: ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री करताच उपनगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे एकीकडे गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक तुडुंब गर्दी करीत होते. त्यामुळे ‘करोना’चा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर तोडगा म्हणून पुणे महानगर पालिकेने घरा जवळ भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
महानगर पालिकेने काढलेल्या या निवेदनात शेतकरी आपली भाजी ठीक ठिकाणी सरकणे नियोजित केलेल्या ठिकाणी विकू शकणार आहे. थेट शेतकरी ही भाजी आणणार आहेत. ती तुमच्यापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने शहरातील सगळ्या मंडई आणि आठवडे बाजारात पालेभाज्या उपलब्ध करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, भाजी खरेदीसाठी मार्केट याडात प्रचंड गर्दी होत आहे. त्याशिवाय महात्मा फुले आणि अन्य मंडईतही तसेच चित्र आहे. पुढील २० दिवस ‘लॉकडाऊन’ असल्याने फळ, पालेभाज्या मिळणार का, याबाबत लोकांत संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या सोयीसाठी आठवडे बाजार आणि मंडईत भाजी उपलब्ध होणार आहे. या पत्रकात महानगर पालिकेने भाजीपाला कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे याची यादी दिली आहे. या उपक्रमाला शनिवारपासून (ता.२८) सुरवात होईल.
या उपक्रमामुळे पुणेकरांना आठवडे बाजाराच्या ठिकाणांसह मंडई, काही क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात रोज भाजी मिळेल. मात्र, रोजच फळ, पालेभाज्या आणि फळे मिळणार असल्याने लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पुणेकरांना रोज ताजी भाजी मिळावी, यासाठी थेट शेतकऱ्यांमार्फतच मालाची विक्री करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हा आणि अन्य काही भागांतील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला काही प्रमाणात स्वस्तही मिळेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले.

