पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले; गट-गण आरक्षण कोर्टात अडकले, राजकीय रणधुमाळीला सुरुवात!

पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात आता रंगत आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे इच्छुक नेत्यांच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून, राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

मात्र गट-गणांच्या आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयात अडकला असून, यामुळे अध्यक्षपदाचा तिढा कायम राहिला आहे. कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतरच पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

दरम्यान, सर्वसाधारण गटाला अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने मोठी चुरस निर्माण होणार आहे. पंचायत समिती सभापती पदांवरही लोकसंख्या आणि सोडत पद्धतीनुसार आरक्षण होणार असून, स्थानिक जनगणनेच्या आधारे अनुसूचित जाती-जमातींसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहेत.

या घडामोडींनी पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजणार असल्याची चर्चाही जोर धरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे