अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयारी; कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यात नुकतेच आमदार सुनील शेळके यांनी भाजपला लक्ष्य करत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीदेखील रणशिंग फुंकत पक्ष कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वळसे पाटील म्हणाले, “स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका. सर्वांनी पक्षशक्ती वाढवण्यासाठी आणि एकजुटीने काम करण्यासाठी पुढे या. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मकतेने काम करण्याचा सल्ला दिला आणि केंद्र व राज्य दोन्ही सरकारे एकाच विचारधारेची असल्याने विकासकामांसाठी निधी मिळवणे सुलभ होईल, असेही सांगितले.

याच मेळाव्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षातील गटबाजीवर नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. “निवडणुकीत निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी. स्थानिक पातळीवरील गट-तट पक्षाला हानी पोहोचवतात. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून राष्ट्रवादीच्या विजयासाठी प्रयत्न करावेत,” असे ते म्हणाले.

या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाने तयारीचा बिगुल वाजवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील