पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले असून, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
ही घटना शनिवारी सायंकाळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ घडली. एका वॅगनर कार चालकाने भरधाव गाडी चालवत दुचाकीस्वाराला धडक दिली आणि फरफटत नेत ओंकारेश्वर मंदिरापर्यंत गाडी नेली. या अपघातात इतर दोन जणांनाही धडक बसली. अखेरीस कार दुभाजकाला धडकल्याने तिचा चेंदामेंदा झाला.
पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल केला असून, आरोपीची ओळख अनिकेत रमाकांत सोनटक्के (२५, रा. चाकण, मूळचा धाराशिव) अशी झाली आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. रंगमंदिर परिसरात ‘खत्री वडेवाले’ यांच्या समोरून भरधाव वेगाने आलेल्या वॅगनर कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला; मात्र कारचालकाने दुचाकी फरफटत नेत पुढे गाडी चालवत नेली. सुदैवाने दुचाकीस्वार ओंकार देशमुख याने वेळेत बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला.
यानंतर आरोपी चालकाने शनिवार पेठेकडे गाडी वळवली आणि पुणे महापालिकेसमोरील पुलावर एका पथारीवाल्या महिलेलाही धडक दिली. अखेरीस गाडी पुलावरील खांबाला जाऊन आदळली. त्यावेळी चालक आणि गाडीत असलेले इतर चार युवक मद्यधुंद अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त गाडी उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गाडीची पुढील आणि डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की
“या अपघातात दुचाकीस्वार ओंकार देशमुख किरकोळ जखमी झाला आहे. त्याने तक्रार देण्यास नकार दिला असला तरी, कारचालकाविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांनी सांगितले की,
“अनिकेत सोनटक्केवर गुन्हा दाखल केला असून, त्याने शिवाजीनगर परिसरात आणखी कोणाला धडक दिली का, याची चौकशी सुरू आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































