पुरंदर, पुणे १० नोव्हेंबर २०२३ : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा ग्रामपंचायतीच्या कामगारांना ग्रामपंचायतीच्यावतीने दिवाळीसाठी ४५ दिवसाचा पगार हा बोनस म्हणून देण्यात आला आहे. आज गुरुवारी निरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामगारांना दिवाळी फराळ (मिठाई) वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी ही माहिती दिली.
नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने दरवर्षी ग्रामपंचायतीच्या सर्वच कामगारांना दिवाळी बोनस दिला जातो. यावर्षी कामगारांच्या पगारात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट बोनस मिळाला आहे. कामगारांना ४५ दिवसाचा पगार हा बोनस म्हणून देण्यात येत असल्याची माहिती उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली. तर कामगारांनी मागील काही दिवसात कामात केलेल्या सुधारणा बद्दल काकडे यांनी कामगारांचे कौतुक केलं व पुढील काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामगारांचे हित जपलं जाईल, कामगारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अनदा शिंदे, अभी भालेराव, सुनील चव्हाण, जबिन डांगे माजी उपसरपंच विजय शिंदे ग्राम विकास अधिकारी राऊत त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना ग्रामविकास अधिकारी राऊत म्हणाले की, ग्रामपंचायतीची परिस्थिती हालाखीच्या असताना देखील पंचायतीने कामगारांची दिवाळी गोड केली आहे. मात्र कामगारांनी देखील या दिवाळीत कोठेही कचरा राहणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. त्याचबरोबर कार्यालयीन कामगारांनी देखील लोकांच्या अडचणी वाढणार नाहीत, याबाबत काळजी घ्यायची आहे. लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून कामगारांनी सहकार्य करायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे