अलीगड : २७ एप्रिल २०२० : जेव्हा खेड्यातील दोन मुलांनी १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला, तेव्हा ही बाब ग्रामपंचायतीकडे गेली. पंचायतीने दोन्ही मुलांना ५-५ चप्पल मारण्यास सांगितले आणि त्यांचे तोंड काळे करून गावभर धिंड काढली. मात्र पंचांचा हा निर्णय झाल्यावर त्या पीडित मुलीने घरात जाऊन आत्महत्या केली. ही लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यातील आहे.
अलिगडमधील दादर भागातील गावात एका मुलीच्या अब्रूची किंमत केवळ ५-५ चपला मारणे आणि तोंड काळे करणे एवढीच राहिली होती. १६ वर्षीय मुलगी सकाळी शौचालयात गेली होती. घरी येताना गावातील दोन तरुण मागोवा घेत आले. घरापाशी येताच त्यांनी त्या मुलीचे तोंड दाबले आणि तिला शेतात ओढून नेले. दोघांनी त्या पिडीतेवर बलात्कार केला आणि धमकी देऊन तिथून पळून गेले.
पिडीत मुलीने घरी येऊन संपूर्ण घटना सांगितली. हे प्रकरण पोलिसांकडे जाण्यापूर्वी आरोपीच्या बाजूच्या लोकांनी हे प्रकरण सोडविण्याची योजना आखली. गावात पंचायत बोलावण्यात आली व त्या पिडीत मुलीला देखील बोलविण्यात आले. पंचांनी असा निर्णय घेतला की पिडीत मुलीने आरोपींना प्रत्येकी पाच पाच चपला माराव्यात. पंचांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे असहाय पीडितेने ते केले. त्यानंतर दोन्ही तरुणांच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड काढून त्यांना अशी समज देण्यात आली की, पुन्हा असे कृत्य केल्यास कठोर शिक्षा केली जाईल.
पोलिसांना या घटनेची कोणतीही खबर मिळू शकली नाही. हा सर्व प्रकार झाल्यावर ती पिडीत युवती घरी आली आणि स्वतःला गळफास लावून तिने आत्महत्या केली. एका गावकऱ्याने पोलिसांना माहिती दिली, तेव्हा तेथील पोलिसांसह उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि युवतीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. गावात फिरत असलेल्या दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे.
एसपी देहात अतुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी