बारामती : बारामती शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पहाटे सहा वाजता रस्त्यावर फिरायला आलेल्या ३१६ नागरिकांना बारामती शहर पोलीस स्टेशनने पहाटे सोशल डिस्टन्स पाळून परेड करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ओळीत योगा करण्याची शिक्षा दिली. यामध्ये शहरातील नामांकित डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी, मोठे व्यापाऱ्यांचा समावेश.
सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला असून संचारबंदी जाहीर केली आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले असताना पहाटे मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी फिरत असल्याची तक्रार आल्यावर बारामती शहर पोलिसानी सात पथक करून शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक साठी फिरणाऱ्या लोकांवर भिगवण रोड, इंदापुर रोड, माळवरची देवी, माळेगाव रोड, टी सी कॉलेज, रिंग रोड सर्व्हिस रोडवर फिरणाऱ्यांवर २७६ पुरुष , ४० महिला यांच्यावर कारवाई केली.
यामध्ये शहरातील नामांकित डॉक्टर ,वकील ,सरकारी कर्मचारी ,मोठे व्यापारी यांचा समावेश आहे. या सगळ्या नागरिकांना पोलिसांनी सोशल डिस्टन्स पाळत परेड करत त्यांना शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ओळीत बसवुन तीन तास योगासने करून घेतली.तसेच त्यांना कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत बाहेर फिरणार नाही व परत दिसल्यास कडक कारवाई करण्यात कारवाई करण्यात येईल असा समज देत सोडण्यात आले.या करवाईमध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले ,स.पो. निरीक्षक योगेश शेलार ,स.पो.निरीक्षक अश्विनी शेंडगे,स.पो.निरीक्षक आर.आर.भोसले ,स.पो.निरीक्षक सचिन शिंदे ,स.पो.निरीक्षक महेश विधाते यांच्या सात टीम सह प्रत्येक टीममध्ये सात पोलीस कर्मचारी सहभागी झालेहोते.
प्रतिनिधी- अमोल यादव