शारजा, २७ ऑक्टोबर २०२०: किंग्जस इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर ८ विकेट्सने मात केली आहे. गिल-मॉर्गन जोडीची महत्त्वाची भागीदारी आणि लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत केवळ १४९ धावांपर्यंतच मजल मारली होती. हे विजयी आव्हान पंजाबने ७ चेंडूआधी २ विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबकडून मनदीप सिंहने सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. तर ख्रिस गेलने ५१ धावांची तडाखेदार खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मनदीप सिंह आणि कर्णधार लोकेश राहुलने यांनी ४७ धावा जोडल्या. यानंतर लोकेश राहुल २८ धावांवर आऊट झाला. त्यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंगच्या साथीने डावाला अपेक्षित गती दिली. मनदीप सिंग आणि ख्रिस गेल दोघांनीही शानदार अर्धशतक झळकावली. ख्रिस गेलने २९ चेंडूत ५१ धावा केल्या. गेलने २९ चेंडूत २ फोर आणि ५ सिक्सच्या मदतीने तडाखेदार ५१ धावा केल्या. तर मनदीप सिंहने ५६ चेंडूत नाबाद ६६ रन्सची खेळी केली. त्याने यामध्ये २ सिक्स आणि ८ फोर लगावले.
कोलकाताच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. नितीश राणा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर शमीने दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (७) आणि दिनेश कार्तिकला (०) माघारी धाडलं. पण शुभमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी पलटवार करत दमदार ८० धावांची भागीदारी केली. सलामीवीर शुभमन गिलने ४५ चेंडूत ३ फोर आणि ४ सिक्सच्या मदतीने ५७ धावा केल्या. तर कर्णधार इयोन मॉर्गनने ४० धावांची खेळी केली.
पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिशनोईने प्रत्येकी २ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच मॅक्सवेल आणि मुर्गन आश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे