मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये रस्ता घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहताना पुण्यातील मुंढवा भागात असलेल्या रस्त्याची रुंदी फडणवीसांनी कमी करुन घेतल्याचा दावा केला जात आहे. याबाबत ‘सामना’ मुखपत्रातून या घोटाळ्याविषयी “सामना” ने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मुंढवा गावात मंजूर झालेल्या २४ मीटर रस्त्याची रुंदी ९ मीटर केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही खटाटोप केल्याची चर्चा समोर येत आहे. परंतु विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापन होण्यास विलंब झाला होता.
त्यावेळी ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीसांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची विनंती केली होती. याच कालावधीत हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
मुंढव्यातील संबंधित रस्ता अरुंद केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. बिल्डरवर अशा प्रकारची मेहरबानी कशासाठी केली जात आहे? असा सवाल पुणेकरांकडून विचारला जात आहे. याबाबत एक वृत्त वाहिणीनेही वृत्त प्रकाशित केले आहे.
मुंढवा गाव पुणे रेल्वे स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर इमारती आणि बंगले उभे राहिले आहेत. भविष्यात इमारतीचं जाळं पसरण्याच्या शक्यतेमुळे २४ मीटर रुंद रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वडगाव शेरीमधील तत्कालीन भाजप आमदार जगदीश मुळीक यांनी बिल्डर्ससाठी २४ मीटरऐवजी १२ मीटर करण्याची मागणी करणारं पत्र १३ मार्च २०१८ रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवल्याचं ‘सामना’त म्हटलं आहे.
रस्ता करताना एका बाजूची ९ मीटर, तर दुसऱ्या बाजूची ३ मीटर जागा संपादित करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आहे. स्थानिकांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून कोर्टानेही वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.