पुणे-हडपसर (प्रतिनिधी): उरूळी देवाची येथे किरकोळ भांडणातून चार दुचाकी जाळण्याचा प्रकार गुरवारी (ता.२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना मयूर पार्क सोसायटी समोर घडली.
लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सूरज बंडगर म्हणाले, “हांडेवाडी रस्त्यावर हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात किरकोळ कारणावरून मारामारी झाली. नंतर देवाची उरूळी हद्दीत दंगेखोरांनी दुचाकी पेटवल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.”
याबाबत अग्निशमन दलाचे आजीत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”आम्हाला दुचाकी जळत असल्याचा कॉल आला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी तातडीने पोहचलो आणि आग आटोक्यात आणली.
या घटनेत चार दुचाकी जळून खाक झाल्या.”
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. भांडण करणाऱ्यांपैकी काही तरूणांनी दुचाकींना आग लावली. यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, त्या अगोदरच दंगेखोर फरार झाले.
याबाबत हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव म्हणाले, ”आमच्या हद्दीत हा प्रकार घडला नसून लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.”
याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लोणी-काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले.