पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी

पुणे, दि.२२ मे २०२०: सध्या कोरोनावर मात करण्यासाठी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. प्रत्येक देश कोरोनावर औषधाच्या शोधासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या प्रायोगिक पातळीवर उपचार सुरू आहेत. त्यात काही दिवसांपासून कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ही थेरपी करण्यात आली होती. १० ते १२ मे दरम्यान ही थेरपी करण्यात आली होती. त्यांनतर ही व्यक्ती ठणठणीत बरी झाल्याचे पहायला मिळत असून त्या व्यक्तीला कोविड वार्डमधून हलविण्यात आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून प्लाझ्मा थेरपी आता यशस्वी होताना दिसत आहे. प्लाझ्मा हा रक्ताचा द्रव भाग असतो. त्यामुळे संशोधकांना अशी आशा आहे की, बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाची कोरोनाशी लढण्याची शक्ती वाढेल. कदाचित आधीच आजारी असणाऱ्या व्यक्तीला आणखी आजारी होण्यापासूनही वाचवेल. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने कमी असते. त्यामुळे अशा रुग्णांना बरे करणे अवघड असते. अशा रुग्णांना बऱ्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा दिल्यास ती व्यक्ती बरी होण्याची शक्यता आहे. असेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

ससूनमधील या यशस्वी प्रयोगामुळे आता उपचारासाठी सकारात्मकता निर्माण झाली आहे. आता मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे. तसेच गंभीर असणाऱ्या रुग्णांवरही उपचार करता येणार असल्याने मृत्यूचा धोकाही टाळता येणार आहे. प्लाझ्मा थेरपीची यशस्वी चाचणी ही सकारात्मक आशा आहे. यातून पुणेकरांना एक आशा निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा