पुणे : कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या प्रक्रिया प्रकल्पांची अवस्था बिकट झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
प्रतिदिन ५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या २० प्रकल्पांमध्ये वर्षभरात अवघ्या २० टक्के क्षमतेने वीजनिर्मिती झाली असल्याचे पुढे आले आहे.
महापालिकेने गेल्या काही वर्षांत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे २५ प्रकल्प शहरातील काही भागात उभारले आहेत. या प्रक्रिया प्रकल्पातून प्रतिदिन सुमारे १२५ टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागावी, व वीजनिर्मिती व्हावी, हा हे प्रकल्प सुरू करण्याचा प्रमुख उद्देश होता.
प्रकल्पांची उभारणी, देखभाल दुरुस्ती यांच्या खर्चाचे प्रमाण लक्षात घेतले तर वीजनिर्मिती मात्र अत्यल्प होत असल्याची वस्तुस्थिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पुढे आणली आहे. कचऱ्याच्या प्रश्नावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेवर ताशेरे ओढले आहे.