Purandar Airport Project: पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षित विमानतळाच्या जमिनीच्या संपादनाला लवकरच वेग येणार आहे. तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांतील जमिनींच्या मोजणी आणि सर्वेक्षणासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) १० मार्चला अधिसूचना जारी केल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी झालेल्या महसूल आणि उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कायद्यान्वये ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकांतील जमिनींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे. त्यासाठी जमिनीच्या मोजणीला लवकरच सुरुवात होणार आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सात गावांसाठी स्वतंत्र चार भूसंपादन अधिकारी नेमावेत की एकच अधिकारी नियुक्त करावा, यावर चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. येत्या आठवडाभरात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
“विमानतळासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करून पुढील प्रक्रियाही सुरू करण्यात येईल” असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
या विमानतळामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे