पुरंदर, पुणे ३ जानेवारी २०२४ : पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचे नाव दोन वेगवेगळ्या मतदार संघात असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने या बाबत आ.संजय जगताप यांना नोटीस दिली आहे. ४ तारखेला निवडणूक कार्यालयात रहिवाशी पुरावे घेऊन हजर न राहिल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल असं त्या नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.
पुरंदर हवेली मतदार संघातील ३२ हजार लोकांना मतदार यादीत दुबार नावे असल्याचे म्हणत निवडणूक विभागाने नोटीसा दिल्या आहे. याबाबत काल मंगळवारी आ.संजय जगताप यांनी सासवड येथे निवडणूक कार्यालयात जावून जाब विचारला होता. या नोटिसा चुकीच्या असल्याचं त्यांनी म्हटलं होत. याबाबत त्यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागणाऱ्याच ऐकून प्रशासन काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या नोटिसा कशा चुकीच्या आहे हे देखील संजय जगताप यांनी दाखवून दिलं होत. मात्र यानंतर काल सायंकाळी आ.संजय जगताप यांनाच या बाबतची नोटीस प्राप्त झाली आहे. तुमचं नाव दुसऱ्या मतदार संघात असल्याने तुमचे रहिवाशी पुरावे घेऊन ४ जानेवारीला हजर राहण्यासाठी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना तालुका अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्या कुटुंबातील नावे तालुक्यातील दोन दोन गावात आहेत. त्यांच्या गावी आणि सासवड अशा ठिकाणी त्यांची नावे असल्याचं आमदार संजय जगताप यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या यादीत शिवसेनेच्या पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील लोकांची नावे आहेत. त्यांना मात्र कोणतीही नोटीस अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल शंका व्यक्त केली जाते आहे.
निवडणूक विभागानं दिलेल्या या नोटीस बाबत काल पत्रकारांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रश्न विचारला. मात्र त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचं म्हणत त्यांनी उत्तर देणं नाकारलं.मात्र अधिकाऱ्यांच्या या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आ.संजय जगताप यांच्या नावाची साम्य असलेल्या तालुक्यात आणखी १४ व्यक्ती असल्याचे आ.संजय जगताप यांनी म्हटलंय. तर मग ही नावे दुबार कशी होतील? असा सवाल जगताप यांनी केला आहे. अनेक लोकांची आडनावे देखील वेगळी आहेत. तरी देखील लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. केवळ दोन नावे समान आहेत म्हणून अनेकांना नोटिसा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे