सभापतीपदी नलिनी लोळे तर
उपसभापतीपदी गोरखनाथ माने
पुरंदर : पुरंदर पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे वर्चस्व असलेल्या या पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नलिनी लोळे तर उपसभापतीपदी गोरखनाथ माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काम पाहिले.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, जि. प सदस्या शालिनीताई पवार, ज्योती झेंडे, माजी सभापती अतुल म्हस्के, उपजिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मावळते सभापती रमेश जाधव आणि उपसभापती दत्तात्रय काळे यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
सभापती नलिनी लोळे या भिवडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या आहेत. पुरंदर किल्ल्याच्या सभोवताली असलेल्या घेरा पुरंदर परिसरातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. पुरंदरच्या दुर्गम भागातील पानवडी या गावच्या त्या रहिवासी असून गावात सरपंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना पंचायत समितीचे तिकीट देण्यात आले होते.
उपसभापती म्हणून नियुक्त करण्यात आलेले गोरखनाथ माने हे प्राध्यापक असून त्यांनी डॉक्टरेट देखील मिळवलेली आहे. बारामतीलगत राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या नीरा शिवतक्रार गणातून त्यांनी अवघ्या ४७ मतांनी थरारक विजय मिळवला होता.
यावेळी बोलताना सभापती नलिनी लोळे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळात तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे जास्तीत जास्त निधी मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.