पुरंदर, दि.१३ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळापासून अाद्याप बंद असलेली एस टी बस सोमावर पासून पुन्हा लोकांच्या सेवेत दाखल होत आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड आगाराची एसटी बस सोमवारी १५ जून रोजी तालुक्यातील फेऱ्या सुरू करत आहे, अशी माहिती सासवडच्या आगारप्रमुख मनीषा गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्रातील जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी (एसटी) हळूहळू सुरू होत आहे. सध्या जनजीवन सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली एसटी बस सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. आज प्रसिद्धि माध्यमांशी यासंदर्भात सासवड आगाराच्या प्रमुख मनीषा गायकवाड यांनी पुरंदरच्या एसटी बाबत माहिती दिली
यामध्ये सोमवारी १५ जूनपासून एसटीच्या तालुका अंतर्गत फेऱ्या सुरू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सासवड-निरा वाल्हे मार्गे व राख मार्गे, सासवड-विर, सासवड-माळशिरस, सासवड-बहिरवाडी, सासवा-बांदलवाडी या ठिकाणच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. यावेळी एसटी बस मध्ये फक्त २२ प्रवासी असणार आहेत; लहान मुले व जेष्ठ नागरिक यांना एस टी मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या दरम्यान एसटीच्या तिकीट दरामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी बस सुरू केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक एसटी बस मध्ये सॅनिटायझेशन केले जाणार आहे. एसटी चालक व वाहक यांना सुरक्षेचे सर्व साधने दिली जाणार आहेत. गाडीमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसवला जाणार आहे. रात्रीच्यावेळी मुक्कामाच्या गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.
सासवड आगाराने एसटी कामगारांचे पगार नियमित केले असून मे महिन्याचा पगार जमा केला आहे अशी माहिती आगारप्रमुख मनीषा गायकवाड यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे