पुरंदर दि.२० नोव्हेंबर २०२० :पुरंदर तहसीलदारांचा बनावट शिक्का आणि सही वापरून त्याच्या द्वारे बनावट आदेश तयार करून जमिनीच्या नोंदणीमध्ये फेरफार केल्या संदर्भातील तक्रार तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सासवड पोलिसांकडे दिली आहे. सासवड, एखतपुर, साकुर्डे या गावातून जमिनीच्या नोंदी बाबत फसवणूक झाल्याचे व बनावट सरकारी दस्ताऐवज बनवून सरकारची फसवणूक केल्याचं तहसीलदारांनी म्हटलं आहे. याबाबत सासवड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम ४२०,४६४,४७८,४७१,४७३,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दिनांक २० फेब्रुवारी ते दिनांक १७ नोव्हेंबर या कालावधीत सासवड, साकुर्डे, एखतपुर याठिकाणी मंदाकिनी अशोक जगताप , दिनकर बाळा जगताप,अभिजित अशोक जगताप तसेच अशोक दिनकर जगताप यांनी बनावट आदेशाचा गैरवापर केलेला आहे. त्याच बरोबर मौजे एखतपुर येथे प्राप्त झालेल्या बनावट आदेशावरील संबंधित व्यक्ती श्रीमती भारती सुरेश कांबळे, बाळकृष्ण भिकु कांबळे,कमल मुकुंद कांबळे, सुनिता सतिश कांबळे, कमल गंगाराम सरोदे (लग्नानंतरचे नाव) कमल गिरजु कांबळे यांनी तहसीलदारांच्या सहीचा शिक्का व कार्यालयाचे बनावट सिल तयार केले.
त्याचा वापर करून खोटे आदेश तयार केले व ते खरे आहेत असे भासवून संबंधीत तलाठी यांचेकडे दाखल केले. त्याआधारे तलाठी यांना फेरफार नोंदी घेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे सदर आदेश खोटे आहेत हे माहीत असताना ते वापरात आणून स्वतःच्या फायद्याकरीता शासनाची फसवणुक केली आहे. म्हणून पुरंदर तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी या विरोधात तक्रार दाखल केली आहे . सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे याबाबतचा तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी