पूर्व हवेलीतील चार कामगार व एक महिला कोरोनाबाधित

कदमवाकवस्ती, दि. २७ मे २०२०: पूर्व हवेलीतील कवडीमाळवाडी कदमवाकवस्ती येथील एक व मांजरी येथील चार असे एकूण पाचजण कोरोना बाधित असल्याचे मंगळवारी (दि.२६) रोजी रात्री उशिरा निष्पन्न झाले. यातील चार जण हे हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये कामगार आहेत. तर एका कामगाराची पत्नी आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली आहे.

मागील गुरुवारपासून सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मंगळवारीही कायम राहिले आहे. व यामुळे पुणे शहराप्रमाणेच पूर्व हवेलीत कोरोनाने थैमान घातले आहे. हडपसर परिसरात वरील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे सात कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा व एका कामगाराची पत्नी असे नऊ जण मागील पाच दिवसाच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

हडपसर परिसरातील वरील कंपनीशी निगडीत असणारे मांजरी बुद्रुक, आळंदी म्हातोबाची व कदमवाकवस्ती हद्दीतील तब्बल नऊ जण कोरोनाबाधित सापडल्याने, पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने गुरुवारपासून दि. २१ कामगारांच्या कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

यात रविवारी दि. ४ मे रोजी आळंदी म्हातोबाची येथील एक तर मांजरी बुद्रुक हद्दीतील एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तर मागील दोन दिवसात कदमवाकवस्ती व मांजरी बुद्रुक हद्दीतील चार कामगार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण एकाचवेळी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. असे “न्यूज अनकट” शी बोलताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले.

हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी रात्री उशीरा निष्पन्न झाले आहे. वरील चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य अशा सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. मागील पाच दिवसात तब्बल नऊ जण कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांनी आप-आपली काळजी घ्यावी असे सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा