शिवसेनेला धक्का, तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई, ७ एप्रिल २०२१: एका वर्षात मुंबईत पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. भाजपाकडून वारंवार पालिका जिंकण्याची भाषा केली जात असताना शिवसेनेसमोर सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान आहे. त्यातच आता शिवसेनेला धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अगदी मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. याचा आगामी पालिका निवडणुकांमध्ये भाजपाला किती फायदा होईल आणि शिवसेनेला किती तोटा, यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली. त्याआधी २०१५ मध्ये आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना तिकीट दिले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात नारायण राणे होते. मात्र तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा