‘पुष्पा : द राइज’ जाणार आता रशियामध्ये

पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : ‘पुष्पा : द राइज’मध्ये दिसणारा अल्लू अर्जुन आता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रशियाला जाणार आहे. या चित्रपटासाठी तो खूप उत्सुक आहे. विशेष म्हणजे ‘पुष्पा : द राइज’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला आहे. एवढेच नाही, तर हिंदी क्षेत्रातही या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू आवृत्तीनेही चांगला व्यवसाय केला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट रशियात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, हा चित्रपट आता थेट रशियामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अल्लू अर्जुनही या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी रशियाला जाणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटात रश्मिका मंदानाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

‘पुष्पा : द राइज’ डिसेंबर २०२२ मध्ये रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन पुढील आठवड्यात रशियाला जाण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘पुष्पा : द रुल’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. अल्लू अर्जुन चित्रपटगृहांमध्ये रशियन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहणार आहे.

अल्लू अर्जुनसाठी हे वर्ष छान गेले. त्याला नुकतेच न्यूयॉर्कमधील ‘ॲन्युअल इंडिया डे परेड’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याला नुकताच ‘इंडियन ऑफ द इअर’चा पुरस्कारही मिळाला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचे चाहते ‘पुष्पा : द रुल’ची वाट पाहत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा