रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यावर हल्ल्याचा आणि त्यांचा घातपात करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला; परंतु प्रत्येक संकटातून ते सहीसलामत बाहेर आले. गेल्या तीन दिवसांपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलन्स्की यांनी पुतीन यांचा लवकरच मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आज त्यांच्या ताफ्यातील कारला अचानक आग लागल्याने हा अपघात, की घात अशी चर्चा होणे स्वाभावीक आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यातील एका कारला अचानक आग लागली. त्यामुळे गोंधळ उडाला. त्याच्या अधिकृत कारच्या ताफ्यातील एका लक्झरी लिमोझिन कारला आग लागली. त्यानंतर ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ (एफएसबी) मुख्यालयाच्या अगदी उत्तरेस मॉस्कोच्या रस्त्यावर स्फोट झाला. पुतीन यांच्या लिमोझिन कारची किंमत सुमारे तीन लाख ५६ हजार पौंड आहे. कारच्या इंजिनात आग लागली आणि नंतर त्यात ती भस्मसात झाली. अग्निशमन दलाची सेवा येईपर्यंत आग शमवण्यासाठी जवळपासच्या रेस्टॉरंट्स आणि बारमधील लोक स्रेटेंका रस्त्यावर जमले होते; मात्र कारमधील आग हा खुनाचा कट होता की केवळ अपघात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २६ मार्च रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला, की पुतीन यांचा लवकरच मृत्यू होईल.
तेव्हापासून अध्यक्षांच्या कार्यालयात पुतीन यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. पुतीन अनेकदा ही लिमोझिन कार वापरतात. गेल्या वर्षी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनाही त्यांनी ही कार भेट दिली होती. या कार रशियात तयार होतात. या गाडीची किंमत ३.४ कोटी रुपये आहे. पुतीन आणि किम यांनीही लिमोझिन कारमधून एकत्र प्रवास केला होता. झेलेन्स्की म्हणाले होते, की पुतीन यांच्या मृत्यूनंतर सर्व काही ठीक होईल. झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले, की पुतीन लवकरच मरतील आणि नंतर सर्व काही (युक्रेन युद्ध) संपेल. पुतीन यांना आयुष्यभर सत्तेत राहायचे आहे. त्याची महत्त्वाकांक्षा युक्रेनपुरती मर्यादित नसून पाश्चात्य देशांशी थेट संघर्षही होऊ शकतो. रशिया आणि युक्रेन युद्ध फार खालच्या थराला गेले आहे. पुतीन यांची हत्या करण्याचा इशारा देईपर्यंत युक्रेनची मजल गेली आहे.
अर्थात पुतीन यांच्या हत्येचे प्रयत्न यापूर्वीही झाले होते. त्यामुळे ते कायम चार सुरक्षा मंडळांमध्ये राहतात. पुतीनचे अंगरक्षक स्वतःला त्यांचे ‘मस्केटियर्स’ असे म्हणवतात. यामध्ये रशियाच्या फेडरल सिक्युरिटी फोर्स (एफपीएस) किंवा ‘एफएसओ’ मधील लोकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे कोणत्याही वॉरंटशिवाय इतर सरकारी एजन्सींना शोध आणि निरीक्षण, अटक आणि आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. पुतीन जेव्हा बाहेर असतात, तेव्हा सशस्त्र ताफ्याचा वेढा त्यांच्याभोवती असतो. यामध्ये एके-४७, अँटी-टँक ग्रेनेड लाँचर्स आणि पोर्टेबल विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पुतीन जेव्हा गर्दीत असतात, तेव्हा त्यांना चार सुरक्षा मंडळांनी वेढलेले असते; परंतु त्यातील एकाच विभागाचे अंगरक्षक दिसतात. दुसरे वर्तुळ गर्दीत लपलेले असते. तिसरे वर्तुळ गर्दीच्या टोकावर असते. याशिवाय जवळच्या छतावरही स्नायपर बसलेले असतात. पुतीन यांचे सुरक्षा रक्षक बाहेरील कोणत्याही गंभीर प्रसंगाचा सामना करण्यासाठी तयार असतात. अहवालानुसार, पुतीन यांना विषबाधा होणार नाही, याची खात्री करण्यासाठी एका अधिकाऱ्याची त्यांच्या अन्नाची चाचणी करण्यासाठी नियुक्ती केलेली असते.
या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या ताफ्यातील लक्झरी लिमोझिनमध्ये आग लागली. लिमोझिनमध्ये आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही; मात्र कारमधील लोक योग्य वेळी बाहेर आल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. त्या वेळी कार कोण वापरत होते, हे स्पष्ट झालेले नाही. ही कार अध्यक्ष पुतीन यांच्या अध्यक्षीय इस्टेट मॅनेजमेंट विभागाची असल्याचे वृत्त आहे. अलीकडेच ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’च्या अधिकाऱ्यांनी मुर्मन्स्कमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. युक्रेनने काल रात्री पुतीन यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात क्रेमलिनवर दोन ड्रोनने हल्ला केला, असा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला.
याला दहशतवादी कृत्य म्हणत रशियन सैन्याने हल्ल्यापूर्वी दोन्ही ड्रोन नष्ट केल्याचे सांगितले. याआधीही पुतीन अनेक हत्येच्या प्रयत्नांतून थोडक्यात बचावले होते. आतापर्यंत अध्यक्ष पुतीन यांच्या हत्येचे पाच प्रयत्न फसले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात युक्रेनचे ‘चीफ ऑफ डिफेन्स इंटेलिजन्स’ किरिल बुडानोव यांनी पुतीन यांच्याबाबत मोठा दावा केला होता. ते म्हणाले, की रशियन-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीलाही पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पुतीन यांच्यावर हल्ला झाला; पण तो अयशस्वी ठरला. २०१२ मध्ये रशियन विशेष सैन्याने चेचन बंडखोर ॲडम ओसमायेव्हला पकडले. पुतीन यांच्या हत्येची योजना आखल्याची कबुली त्याने दिली होती. ॲडम म्हणाला, की मॉस्कोला जाऊन तत्कालीन पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न करणे हे आमचे लक्ष्य होते. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आम्ही हे राबविण्याची योजना आखली होती. ऑक्टोबर २००३ मध्ये ब्रिटिश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुतीन यांना मारण्याचा कट हाणून पाडला होता.
असा दावा करण्यात आला, की दोन संशयित खुन्यांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी एक माजी रशियन गुप्त सेवा सदस्य असल्याचे उघड झाले आहे. पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न २००२ मध्ये अझरबैजानच्या भेटीदरम्यान झाला होता. एका इराकी व्यक्तीला रशियन नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या व्यक्तीचे अफगाणिस्तान आणि चेचन बंडखोर सैन्याशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. तो त्याच्या सहकारी सूत्रधाराला स्फोटके देण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर २००२ मध्येही अधिकाऱ्यांनी पुतीन यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती दिली होती. या वेळी त्यांच्या गाडीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रशियन नेता ज्या रस्त्यावरून जाणार होता त्या रस्त्यावर दुरुस्ती करणाऱ्यांच्या वेशात काही लोकांनी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.
रशियन अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या अंगरक्षकांनाच पुतीन यांच्या जवळ जाण्याची परवानगी आहे. पुतीन आपल्या त्वचेला विषारी पदार्थांपासून वाचवण्यासाठी विशेष हातमोजे मागवल्याच्याही अफवा आहेत. दररोज सकाळी पोहणारे पुतीन विषारी रसायनांचा धोका टाळण्यासाठी दिवसातून अनेक वेळा पाणी तपासतात. पुतीन अनेक महिन्यांपासून त्यांच्या वरिष्ठ मंत्री, सल्लागार आणि सहयोगींना भेटलेले नाहीत. आता ते फक्त व्हिडीओ कॉलवर बैठका घेतात. ७० वर्षीय पुतीन यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांची सत्तेवरील पकड कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, गेल्या दोनच दिवसांपूर्वी पुतीन यांनी युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव दिला होता. युक्रेनमध्ये संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखालील तटस्थ सरकार स्थापन करण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता.
शांततामय मार्गाने तडजोड करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे तटस्थ सरकार अस्तित्वात यावे, असे त्यांनी सुचवले आहे. या प्रस्तावाद्वारे पुतीन यांनी प्रथमच युद्ध समाप्त होण्याच्या दिशेने सकारात्मक वक्तव्य केले होते. झेलेन्स्की यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ गेल्या वर्षीच समाप्त झाला असून त्यांना आता शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नसल्याचेही पुतीन म्हणाले. युक्रेनच्या राज्यघटनेनुसार, देशात ‘मार्शल लॉ’ असताना राष्ट्रीय निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे. युक्रेनमधील सध्याच्या सरकारसोबत झालेल्या कोणत्याही कराराला युक्रेनमधील उत्तराधिकारी सरकार आव्हान देऊ शकतात आणि तटस्थ प्रशासनाखाली नवीन निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले होते.
संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली अमेरिका किंवा युरोपातल्या देशांच्या मदतीने आणि अर्थातच रशियाच्या सहभागाने युक्रेनमध्ये हंगामी तटस्थ सरकारच्या नियुक्तीबाबत चर्चा केली जाऊ शकते, असे पुतीन म्हणाले. हे सरकार लोकशाही निवडणुका घेण्यासाठीच असेल. अर्थात हंगामी तटस्थ सरकारचा एक पर्याय आहे. या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले; मात्र अन्य पर्यायांचा तपशील त्यांनी दिला नाही. युक्रेन आणि रशियामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर युक्रेनमध्ये शांतता सैनिक तैनात केले जाऊ शकतात, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी कालच म्हटले होते. फ्रान्स आणि ब्रिटनसह इतर अनेक देशांनाही या सैन्याचा भाग व्हायचे आहे, असेही मॅक्रॉ म्हणाले होते; मात्र ‘नाटो’ सदस्य असलेल्या कोणत्याही देशाचे शांतता सैन्य युक्रेनमध्ये तैनात करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा पुतीन यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ताफ्यातील गाडीला लागलेल्या आगीकडे घातपात म्हणून पाहिले जात आहे.
प्रतिनिधी,भागा वरखाडे