आर प्रज्ञानंदा फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

बाकू, अझरबैजान २२ ऑगस्ट २०२३ : बुद्धिबळातील भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदा, याने फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने काल झालेल्या उत्कंठावर्धक लढतीत, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा ३.५, २.५ असा टायब्रेकमध्ये पराभव केला. हा पराक्रम करणारा प्रज्ञानंदा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विश्वनाथन आनंदच्या नावावर होता. अंतिम फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.

ही स्पर्धा अझरबैजानमधील बाकू येथे खेळवली जात आहे. टाय ब्रेकरमध्ये खेळाडूच्या मागील सामन्यांच्या स्कोअरच्या आधारे टाय ब्रेकचा स्कोअर तयार केला जातो. अधिक गुण मिळविणाऱ्याला विजेता घोषित केले जाते, त्यानुसार प्रज्ञानंदा हा विजेता ठरला आहे. अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनशी होणाऱ्या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, आर.प्रज्ञानंदा आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात नेहमीच काट्याची लढत होते. मॅग्नस कार्लसन हेड टू हेड पुढे आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत १९ सामने झाले असुन यापैकी कार्लसनने ७ आणि प्रज्ञानंदाने ५ जिंकले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले. कार्लसनसोबत शेवटचा सामना टाटा स्टील चेस चॅम्पियनशिपमध्ये त्याने ड्रॉ केला होता.

आर.प्रज्ञानंदाच्या कामगीरी विषयी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी ट्विट केले आहे. सोशल नेटवर्किंग साइट ‘एक्स’वर दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी पोस्ट केले की, प्रज्ञानंदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो कारुआनाचा पराभव केला आणि आता त्याला मॅग्नस कार्लसनचे आव्हान असेल. खूप छान. ट्विटमध्ये पूढे आनंद म्हणतात की, गेल्या गुरुवारी प्रज्ञानंदाने सडन डेथ टायब्रेकमध्ये भारताच्या अर्जुन इरिगाईसीचा 5-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. प्रज्ञानंदाने पुढच्या वर्षीच्या उमेदवारांच्या स्पर्धेत आधीच जागा निश्चित केली आहे. अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा याला टायब्रेकरमध्ये पराभूत करून प्रज्ञानंदाने FIDE विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय खेचला.

मला फायनलमध्ये पोहोचण्याची अपेक्षा नव्हती. मी फक्त माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन आणि पुढे काय होते ते पाहीन. मला या स्पर्धेत मॅग्नसविरुद्ध खेळण्याची अपेक्षा नव्हती, असे फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञानंदा म्हणाला. चेन्नईस्थित प्रज्ञानंदाने २०१८ मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा तो भारतातील सर्वात तरुण खेळाडू आणि त्यावेळी जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. प्रज्ञानंदा हा भारतातील तामिळनाडू राज्यातील आहे. प्रज्ञानंदाचा जन्म चेन्नई येथे झाला. त्याचे वडील रमेशबाबू तामिळनाडू स्टेट कॉर्पोरेशन बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. प्रज्ञानंद २०१६ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर बनला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा