पाकिस्तान, सिंध, दि. ५ मे २०२०: पाकिस्तानी हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एका हिंदू वैमानिकाची निवड झाली आहे. राहुल देव असे या हिंदू युवकाचे नाव असून तो पाकिस्तानी हवाई दलात जनरल ड्यूटी पायलट हे पद सांभाळेल. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार राहुल देव सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या थारपारकरहून आला आहे. थारपारकरमध्ये हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात. अखिल पाकिस्तान हिंदू पंचायत सचिव रवी दवानी यांनी पाकिस्तानी हवाई दलात पायलट म्हणून राहुल देव यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की अल्पसंख्याक समाजातील बरेच लोक यापूर्वीच पाकिस्तानी लष्कर आणि नागरी सेवांमध्ये सेवेत आहेत.
पाकिस्तानमधील अनेक डॉक्टर हे हिंदू समाजातील आहेत. ते म्हणाले की, सरकारने अल्पसंख्यांकांकडे लक्ष दिल्यास येत्या काही काळात अनेक राहुल देव देशाची सेवा करण्यास तयार असतील. सोशल मीडियावर राहुल देव यांचीही चर्चा व कौतुक होत आहे. सिंध प्रांतातील हा भाग मागासलेला असून देखील , राहूल यांनी पाकिस्तानी हवाई दलात जीडीपी (जनरल ड्यूटी पायलट) सारखे मोठे पद मिळविले. राहूलच्या या कर्तृत्वाला सोशल मीडिया वापरकर्ते त्याचे विलक्षण यश म्हणत आहेत.
संपूर्ण सिंध प्रांतामध्ये थारपारकर जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक सर्वात वाईट आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा व शैक्षणिक यंत्रणेची स्थिती गोंधळलेली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील अन्न-पाणी संकट आणखीनच तीव्र झाले. हि सर्व आव्हाने असूनही राहुल देव यांनी आपल्यासारख्या बर्याच लोकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
२०१८ च्या निवडणुकीदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले की आपण अल्पसंख्याकांच्या नागरी, सामाजिक आणि धार्मिक हक्कांचे रक्षण करू. मात्र, इम्रान खान सत्तेत आल्यानंतरही काहीही बदलले नाही. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना त्यांना असलेला हक्क आणि आदर मिळाला नाही. अलीकडचे अल्पसंख्यांक समुदयाने सिंध प्रशासनावर धार्मिक कारणास्तव भेदभाव केल्याचा आरोप केला. सिंध प्रशासनाने त्यांना रेशन व अन्नधान्य पुरवण्यास नकार दिला अशी हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील लोकांनी तक्रार केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी