राहुल गांधी मुळे काही फरक पडत नाही- शरद पवार

पुणे- महाराष्ट्रात महायुती पुन्हा सत्तेत आली तरी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या प्रचाराच्या बॅटिंगचीच सर्वत्र चर्चा आहे. पवारांच्या पाॅवरफुल प्रचारामुळे कोमेजलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली. काँग्रेसची नेतेमंडळी फारशी प्रचारात उतरली नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधीना माझ्यासारखा महाराष्ट्रात मजबूत पाया नसल्याचे म्हटले. काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारात आघाडी घेतली नाही. सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यात आल्या नाहीत. मी महाराष्ट्रात अनेक वर्षे समाजकार्य केले. त्यामुळे एक जबाबदारी म्हणून प्रचारकार्यात आघाडी घेतली. मात्र, हरियाणात गेलो नाही. कारण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. राहुल गांधी यांनी उत्तर भारतात कष्ट घेतल्याचा त्यांना फायदा झाला, असे शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पवार म्हणाले, तत्त्वासाठी राजीनामा दिला तर ठीक. लोकांना पक्षांतर आवडत नाही. विधानसभेपूर्वी केलेले पक्षांतर तत्त्वनिष्ठ नाही. सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते म्हणून राजकीय मंडळींनी पक्षांतर केले. हे लोकांना पटले नाही. प्रस्थापित नेतेमंडळींना लोकांनी नाकारले. ही निवडणूक एकतर्फी असल्याचे चित्र जनसामान्यांत उभे करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. त्यामुळे लोकांना ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. गेल्या निवडणुकीत लोकांसमोर प्रभावीपणे भूमिका मांडली नाही ही आमची कमतरता आहे. लोकांना दोष देता येणार नाही. ही कमतरता भरून काढण्याच्या आव्हानाचा सामना करत लोकांमध्ये गेलो.

जनतेने आम्हाला विरोधात बसण्याची जागा दिली महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधात बसण्याची संधी देऊन सन्मानाची जागा दिली. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना युती करण्याच्या रस्त्याने आता जायचे नाही. कारण लोकांसमोर शेतमालाचे आणि इतर प्रश्न आहेत. या आणि इतर प्रश्नांवर जनमत करण्याकडे आमचा कल असल्याचे पवार यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा