नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२२: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत. यावेळी ही यात्रा तेलंगणात पोहोचली असून तिथे त्यांनी पाचव्या दिवशी लोकनृत्याचा आनंद लुटला, तसेच तिथे शाळकरी मुलांसोबत धाव घेतली. राहुल गांधींचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाळकरी मुलांसोबत राहुल गांधींनी लावली शर्यत !
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असलेले राहुल गांधी पदयात्रेदरम्यान अचानक काही शालेय विद्यार्थ्यांसोबत धावू लागले. या यात्रेत काही विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी राहुल गांधी यांनी या मुलांना शर्यत लावायची का असा प्रश्न केला आणि मुलांनी हो, असे उत्तर दिल्याने ही शर्यत रंगली. मात्र, राहुल यांच्या अचानक धावण्यामुळे त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
पारंपारिक ‘बथुकम्मा नृत्या’त घेतला सहभाग !
माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेलंगणातील गोलापल्ली येथे भारत जोडी यात्रेदरम्यान पारंपारिक बथुकम्मा नृत्यात भाग घेतात. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी महिलांसोबत डान्स करताना दिसत आहेत. राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही दिसत आहेत.
भारत जोडो यात्रा लवकरच असणार महाराष्ट्रात!
भारत जोडो यात्रेने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश करून तेलंगणात प्रवेश केला आहे. तेलंगणानंतर भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.