मानहानी प्रकरणी राहुल गांधीना दोन वर्षांची शिक्षा; सूरत कोर्टाचा मोठा निर्णय

सूरत, २३ मार्च २०२३: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सूरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत हा निर्णय दिला. २०१९ ला कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणी त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचुकल्यावर जामीन मंजूर झाला असल्याची माहिती राहुल गांधी यांच्या वकिलांनी दिली.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलर येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोदी यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की, देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे. या प्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ तारीख निश्चित केली होती. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा