नवी दिल्ली, ८ ऑक्टोंबर २०२०: हातथरस प्रकरणाबाबत सर्वत्रच सध्या राजकारण तापत आहे. भारतीय जनता पक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर राज्यात जातीय दंगा व सांप्रदायिक हिंसाचार पसरवण्याचा आरोप केलाय. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ५ मिनिट ४१ सेकंदाचा व्हिडिओ सामायिक केला आहे.
हा व्हिडिओ सामायिक करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी यूपी सरकारवरही निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, पहा, हाथरस पीडितेच्या कुटूंबाला यूपी सरकारच्या शोषण आणि अत्याचाराचा सामना करावा लागला. यावर राहुल गांधी थांबले नाहीत. त्यांनी पुढं असंही म्हटलं आहे की, हाथरस पीडित कुटूंबावर होणाऱ्या अन्यायाचं सत्य प्रत्येक भारतीयांपर्यंत जाणं फार महत्त्वाचा आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पीडितेच्या कुटूंबाशी बोलताना दिसत आहेत. व्हिडिओत पीडितेचे नातेवाईक असा आरोप करतात की, आमच्या मुलीचं अंत्यदर्शन देखील पोलिसांनी घेऊन दिलं नाही. डीएम वरही गुंडगिरी केल्याचा आरोप हे कुटुंब करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी आणि त्यांची बहीण काँग्रेस प्रभारी सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या कुटूंबाची भेट घेतली आणि त्यांना न्यायाच्या लढाईत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
यूपी सरकारनं हाथरस घोटाळ्याच्या वेषात जातीय आणि सांप्रदायिक दंगलीच्या षडयंत्र रचल्याचा दावा केला होता. या प्रकरणात यूपी पोलिसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या चार सदस्यांना अटकही केली आहे. ईडी’नं प्राथमिक चौकशीनंतर म्हटलं होतं की, पीएफआय’ला दंगलीसाठी मॉरिशसमधून ५० कोटींचा निधी मिळाला होता. एकूण निधी १०० कोटींपेक्षा जास्त असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे