जानेवारीमध्ये मुंबईत रेल्वे सुरू होणार, पालिका आयुक्तांनी दिले संकेत

मुंबई, ११ डिसेंबर २०२०: सामान्य लोकांना रेल्वे प्रवास सुरू करण्यात यावा अशी मागणी मुंबईकर सातत्याने धरून आहेत. मागील सात ते आठ महिन्यांपासून मुंबईतील रेल्वे सेवा बंद आहे. सुरुवातीला मुंबई हे कोरोना चे हॉटस्पॉट झाले होते. मात्र, सध्या स्थितीला मुंबईत कोरोनाची स्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून रेल्वे सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडय़ांतील करोनास्थितीचा आढावा घेऊन जानेवारीत सर्वासाठी रेल्वेप्रवास खुला करण्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी दिले.

पुढील दोन आठवड्यावर ख्रिसमस व ३१ डिसेंबर यासारखे दोन महत्त्वाचे दिवस येत आहेत. या दरम्यान जर नागरिकांनी गर्दी केली नाही तर याबाबत निर्णय घेऊ असे आयुक्तांनी सांगितले. विशेष म्हणजे या आधी देखील दिवाळी मध्ये मुंबईत संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली होती. मात्र, दिवाळीनंतरही मुंबईत कोरोनाची स्थिती सामान्यत राहिली. दिवाळीनंतर चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण घटले आहे. मे-जून महिन्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण ३८ टक्के होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हेच प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत घसरले.

हीच स्थिती पुढील दोन आठवडे कायम राहिली तर जानेवारीमध्ये सर्वाना रेल्वेप्रवासाची मुभा देण्याचा विचार करता येईल. तसेच सर्वासाठी १५ डिसेंबरनंतर रेल्वेप्रवास खुला होण्याची शक्यता होती. मात्र, नाताळनंतर सर्वाना रेल्वेप्रवासाची मुभा देण्याची शिफारस रेल्वे प्रशासनाला करण्याचा विचार महापालिका करत आहे अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा