अंधेरी पूर्व, ४ ऑगस्ट २०२०: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईमध्ये कालपासून चांगलीच दमदार सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार केवळ दहा तासांमध्ये २३० मी मी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील २४ तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान मुंबईतील अंधेरी पूर्व येथील काही भागांमध्ये पावसाचे चांगलेच भयानक दृश्य बघण्यास मिळाले आहे. अंधेरी पूर्व एस आर पी एफ भागातील काही दृश्य न्यूज अनकटच्या हाती लागली आहेत. एस आर पी एफ प्लाटून पाच मधील हि दृश्ये असून पूर्ण कॅम्प मध्ये पाणी शिरले आहे. जवानांची राहण्याची जागा देखील जलमय झाली असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू देखील पाण्याखाली आलेल्या दिसत आहेत.
मुंबईसह उपनगरात आज (४ ऑगस्ट) आणि उद्या (५ ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारी आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आल्या आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी