राज्यात पुढील चार दिवस पाऊस,अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे, १ ऑक्टोंबर २०२३ : राज्यात मान्सूनचा कालावधी संपला आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यानंतरही अनेक जिल्ह्यात पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही. सप्टेंबर महिन्यात सुरु असलेला पाऊस ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कायम आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे परिसरात रविवारी दिवसभर पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असणार आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येईल. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कराडमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस राहणार आहे. कोकणातही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस असणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धारण साखळीत ९७ टक्के म्हणजेच २८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे परिसरातील टेमघर वगळता इतर सर्व धरणे भरले आहेत. पुणे परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि घाट माथ्यावर चांगल्या पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा