पुणे, १ जून २०२३ : हिमालयापासून मध्येप्रदेशपर्यत व दक्षिण भारतात धो-धो पाऊस बरसत असताना महाराष्ट्रात मात्र प्रखर उष्णतेची लाट आहे. ही लाट ४ जूनपर्यंत राहणार असून त्यापूढे अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून तब्बल ११ दिवसांनंतर अंदमानातून पुढे सरकला. यंदा त्याचा मुक्काम दरवर्षीपेक्षा तेथे जास्त काळ झाला. आता तो मालदीव बेटांत प्रगती करत आहे.
अफगाणिस्तानात १ जूनपासून नवा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश किनारपट्टी भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडत असला तरीही उष्णतेची लाट कायम आहे. १ ते ३ जूनपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीत कमाल तापमान ४० ते ४२ अंशांवर राहिल. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणला वेदर डिस्कंफर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात वेगाने बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यात ४ जूननंतर जोरदार अवकाळी पाऊस बरसेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर