पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंडच्या बिनबाद २५ धावा

नॉटिंगहॅम, ७ ऑगस्ट २०२१: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. त्यानंतर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले या दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. ११.१ षटके खेळल्यानंतर पावसाने खेळात व्यत्यत आणला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले.

पहिला दिवस टीम इंडियाचा

इंग्लंडच्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस बुधवारी (४ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना ६६ षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा ६५.४ षटकात १० बाद १८३ धावांवर थांबला. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने ३ तर शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीला भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी ९७ धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताची ४ बाद १२५ अशी अवस्था केली होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा