देशातील अनेक भागांत पावसांचे थैमान, दिल्लीतील पावसाचा ४० वर्षांचा विक्रम मोडीत,दिल्लीत अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

नवी दिल्ली,९ जुलै २०२३ : देशभरात मान्सूनने चांगलेच थैमान घातले आहे. धो धो पडणाऱ्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेशात ४० वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला आहे. नवी दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.तर दिल्लीतील पावसामुळे अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व मंत्री आणि अधिकारी रविवारीसुद्धा कार्यालयात दाखल झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दिल्लीत मुसळधार पावसामुळे ४० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. यापूर्वी १९८२ मध्ये सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २०२3 मध्ये २४ तासांत आता १५३ मिमी पाऊस झाला आहे. आता पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, ओडिशा, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हिमाचल प्रदेशात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुल्लू, मनालीमधील अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मनालीहून अटल टनल ते रोहतांग दरम्यान जाणारा रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे कुल्लू मनाली, पाण्याखाली गेले आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे १० आणि ११ जुलै रोजी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ब्यास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. तसेच अनेक दुकाने आणि एटीएममध्ये पाणी शिरले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. पुंछमध्ये पोशाना नदी ओलांडताना दोन जवान वाहून गेले आहे. हिमाचल प्रदेशात नदीवरील पूल वाहून गेला आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील २४ तासांत राज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा