राज्यात पावसाचा जोर वाढणार, बंगालच्या उपसागरातील बदलांचा परिणाम

पुणे, १६ जुलै २०२३ : जुलैचा दुसरा आठवडा लोटला तरही राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. धरणांमध्ये सध्या फक्त ३० टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांत सरासरी १६ टक्के कमी जलसाठा आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे अजून भरलेली नाही. अजूनही सर्वत्र पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू धरणांमध्ये १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. परंतु आता राज्यात पाऊस जोर धारणार आहे.

बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील पावसावर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. १५ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी आणखी एक चक्रीवादळ तयार होईल. यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे १७ आणि १८ जुलै या काळात कोकण किनारपट्टीसह अन्य भागातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.कोकणात १७ ते २२ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. हवामान विभागाकडून १७ आणि १८ जुलैला कोकणात ऑरेंज अलर्ट दिला आहे.चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती मदत कार्यासाठी ही टीम आता चिपळूणमध्येच राहणार आहे. डॉक स्कॉड आणि साहित्यासह एनडीआरएफ टीम चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी राहणार आहे.

पुण्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, नवी पेठ,सदाशिव पेठ भागात पावसाने दमदार हजेरी लावली. पुण्यात आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. संततधार पावसामुळे वेसरफ लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातून ६६ क्युसेक्सचा विसर्ग सुरु केला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा