दिल्ली येथे होणार्‍या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून निवड

पुणे २० सप्टेंबर २०२४ : सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी दिल्ली येथे होणार्‍या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची राष्ट्रीय पातळीची बोधचिन्ह निवड स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत १०० हून अधिक नामांकित स्पर्धकांकडून उल्लेखनीय अशी बोधचिन्हे तयार करण्यात आली होती. यापैकी संमेलनासाठीचे बोधचिन्ह निवडण्याची महत्त्वाची जबाबदारी सरहदकडून प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मिळालेल्या बोधचिन्हापैकी मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हीटी अँड आर्टचे (लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) प्रसाद गवळी यांच्या बोधचिन्हाची अंतिम निवड करण्यात आलीय.

“महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणी बोधचिन्हात स्पष्ट दिसत आहे. तसेच सदरचे बोधचिन्ह सरळ आणि साधे असल्यामुळे निवडण्यात आले आहे.” असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी दिले.

सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रसाद गवळी यांचा विशेष सन्मान दिल्लीमधील साहित्य संमेलनात केला जाईल अशी माहिती सरहदचे संस्थापक, अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा