बाळासाहेब असते तर भारत-पाक सामना होऊ दिला नसता, राज ठाकरेंच्या मनसेचा निषेध

मुंबई, ३० जून २०२३: आयसीसीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे . या वेळापत्रकानुसार भारतात ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू होत आहे. या अंतर्गत १५ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. आता या सामन्यावरून, राज ठाकरे यांचा पक्ष मनसे पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात खेळण्यास विरोध करत आहे. मनसेचे प्रवक्ते भारत-पाक सामन्याला विरोध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावर राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व भाजपला पाकिस्तानच्या भारतातील खेळाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

संदीप देशपांडे म्हणाले की, भारत-पाकिस्तान सामना भारतात व्हावा, हे आम्ही कदापी मान्य करणार नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी हा सामना होऊ दिला नसता. आणि तोही नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना त्यांनी स्वीकारला ही नसता. यावर भाजप आणि शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही उद्धव ठाकरेंना विचारतही नाही, कारण त्यांनी हिंदुत्व सोडले आहे.

पत्रकारांशी बोलताना मनसेचे प्रवक्ते म्हणाले की, २६/११ आणि पुलवामासारखे हल्ले ज्या लोकांनी घडवून आणले, त्यांनी इतके बॉम्बस्फोट घडवून आणले, की मोजता येणार नाहीत. आपल्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान भारताविरुद्ध असे अनेक कारनामे करत आहे. लोक म्हणतात खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नका. मात्र हे पाकिस्तानी खेळाडू वेळोवेळी काश्मीरबाबत आपले मत व्यक्त करत आहेत. अशा लोकांचे भारतात स्वागत करायला हवे का? तेथून बरेच लोक सामना पाहण्यासाठी येतील. येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातील. हे सगळं बघून आपण सहन करू शकू का? त्यामुळे याला विरोध होणे गरजेचे आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा