पुणे,२१ ऑगस्ट २०२१ : काल राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पवार यांनी केलेली टीका. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला होता. “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला शरद पवार यांनी विचारला होता. आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरेंनी पवार यांना प्रत्युत्तर दिलं. ‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’ असं प्रतिउत्तर राज ठाकरे यांनी दिलं.
आपलं बोलणं पूर्ण करत ते पुढे म्हणाले की, अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.
दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका जाहीर मुलाखतीचा देखील संदर्भ दिला. “मी त्यांना त्या मुलाखतीत विचारलं होतं की महाराष्ट्राचा असा एक हुक कोणता आहे ज्याद्वारे सगळे एक होतात, एकत्र येतात? ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज. मग मी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज हेच जर आहेत, तर तुमच्या भाषणात तुमचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.
शरद पवारांचा खोचक सल्ला!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा खोचक सल्ला दिला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे