मुंबई, दि. ८ जुलै २०२० : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या ‘राजगृह’ या वास्तूवर काल दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. अनेकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत हल्लेखोरांना शोधून कठोर शासन व्हावे असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. अनेक मंत्री आणि राजकारण्यांनीही या घटनेबद्दल आपापली मते व्यक्त केली आहेत.
अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतल्या या राजगृहाला भेट दिली आणि आंबेडकर कुटुंबियांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले कि, हा प्रकार निंदनीय आहे, मनाला यातना देणारा आहे. आमच्यासाठी राजगृह ही केवळ वास्तू नसून ते एक श्रद्धालय आहे. इथल्या प्रत्येक अणु – रेणुमध्ये बाबासाहेबांचे वास्तव्य आहे. त्यांनी जगाला दिशा दिली, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ज्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं त्यानी करोडो लोकांना वर्गात बसण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या घराबाहेर असं काहीतरी होणं हे कोणीतरी विकृतच करु शकतो.
पुढे ते म्हणाले की, मी आंबेडकर कुटुंबियांशी संवाद साधला आहे. कुणीतरी वेडसर माणूसच हे करु शकतो. या घटनेला कोणताही राजकीय रंग न देता सखोल चौकशी केली जाईल आणि कुणीही असो त्याला शासन केले जाईल असंही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे