जोधपूर, २० डिसेंबर २०२२ :पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात राजस्थानमधील लोंगेवाला चौकीवर अतुलनीय शौर्य दाखवणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी सैनिक भैरोसिंह राठोड यांचे सोमवारी जोधपूरमध्ये निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
युद्धावर आधारित १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने भैरोसिंह यांची भूमिका साकारली होती. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी ‘ट्वीट’ संदेशाद्वारे जाहीर केले, की शूर भैरोसिंह राठोड यांनी जोधपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) अखेरचा श्वास घेतला. राठोड यांचे पुत्र सवाई सिंह यांनी सांगितले, की, त्यांच्या वडिलांची तब्येत खालावल्याने व अर्धागवायूचा झटका आल्यामुळे त्यांना १४ डिसेंबर रोजी जोधपूर येथील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात, भैरोसिंह राठोड हे थरच्या वाळवंटातील लोंगेवाला चौकीवर तैनात होते. ‘बीएसएफ’च्या एका छोट्या तुकडीचे नेतृत्व ते करत होते. त्यांच्यासोबत लष्कराच्या ‘२३ पंजाब रेजिमेंट’मधील कंपनीही येथे तैनात होती. भैरोसिंह यांच्या अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवत ५ डिसेंबर १९७१ रोजी या ठिकाणी आक्रमण केलेल्या पाकिस्तानी ब्रिगेड व रणगाडा दलाचा नायनाट केला. ‘बीएसएफ’च्या नोंदीनुसार ‘२३ पंजाब रेजिमेंट’मधील एक सैनिक शहीद झाल्यानंतर ‘लान्सनायक’ भैरोसिंह आपल्या ‘लाईट मशीन गन’द्वारे ‘करो या मरो’ या निर्धाराने शत्रूवर तुटून पडले. या कामगिरीसाठी त्यांना १९७२ मध्ये सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.