राजस्थानच्या जयपूरमध्ये एकापाठोपाठ एक तीन भूकंपाचे धक्के, भयभीत नागरिक जीवमूठीत धरून पळाले

जयपूर, २१ जुलै २०२३ : आज पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी राजस्थानची जमीन हादरली. जयपूरमध्ये १६ मिनिटाच्या आत एकापाठोपाठ एक तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर ४.४ एवढी तीव्रता नोंदवली गेली. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे साखर झोपेत असलेले नागरिक चांगलेच हादरून गेले. लागोपाठ तीनवेळा जमीन हादरल्याने नागरिकांनी जीवमूठीत घेऊन घरातून बाहेर पळ काढला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जयपूरमधील लोक चांगलेच भयभीत झाले होते.

जयपूरमध्ये पहिला भूकंपाचा धक्का पहाटे ४ वाजून ९ मिनिटांनी जाणवला. त्यानंतर ४ वाजून २३ मिनिटांनी दुसरा तर ४ वाजून २५ मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ एवढी नोंदवली गेली. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३.४ आणि तिसऱ्या भूकंपाची तीव्रता ४.४ एवढी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून घाबरून बाहेर पळाले.काही लोक पार्कमध्ये जाऊन बसले. तर काही लोक उघड्यावर जाऊन बसले. या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सर्वच लोक भयभीत झाले होते. आपल्या लहान मुलाबाळांसह सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले होते. काही मोठा अनुचित प्रकार तर घडणार नाही ना? हीच भीती त्यांच्या चेहऱ्यावर होती.

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या हदऱ्यानंतर राजस्थानाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ट्विट करून भूकंपाची माहिती दिली. जयपूरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी आशा आहे, असे या ट्विटमध्ये वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा