मुंबई : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात राजभवनावर निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या आंदोलनामध्ये शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. परंतु पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा अडवला असून बच्चू कडू यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
तत्पूर्वी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी बच्चू कडू यांच्या मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही बच्चू कडू हे मोर्चा काढण्यावर ठाम होते. यामुळे बच्चू कडू यांनी मोर्चा काढल्यानंतर हा मोर्चा नरिमन पॉईंट येथे अडवण्यात आला व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.